द सह्याद्री

गर्जा महाराष्ट्र माझा
अवघ्या महाराष्ट्र-सह्याद्रीचं दैवत पहिले छत्रपती, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, रयतेचा जाणता श्री शिवाजी महाराज, ती संकल्पना मनी बाळगणारे शाहजी राजे आणि राजमाता जीजाऊ, अखिल सह्याद्रीचा छावा, बाविसाव्या वर्षी स्वराज्याची जबाबदारी अंगावर पडलेली असताना सलग नऊ वर्षे औरंगजेबला झुंझवणारे, मरणाच्या दाढेत म्रुत्युला पण भिकारी करणारे महाराष्ट्राचे दुसरे छत्रपती शंभुराजे आणि त्यांच्या अमानुष हत्येनंतर रायगड लढ़विणार्‍या राणी येसूबाई, जिंजीहून मोगली फौजांचा धुव्वा उडवीणारे छत्रपति राजाराम राजे...यांना प्रणाम !!!
द सह्याद्री...!!! नावातच सर्व काही...!!!
इतिहास ध्यानी घेत नाही तोवर तो केवळ एक भूमीखंड असतो. इतिहासाचा दीप मनी उजळता क्षणी ती पवित्र युद्धभूमी होते. इथल्या मातीच्या प्रत्येक ढेकळाला त्या शूर पूर्वजांनी धरतीवर सांडलेल्या रक्ताचा गंध आहे.तो आपल्याला जाणवायला हवा. मग ही दुर्ग यात्रा सुफळ संपूर्ण होते. एरवी नुसती पायपिटी होते. यावेगळं अगदी निसर्गसौंदर्याच्या दृष्टीनं जरी किल्ल्यांकडे पाहायचं म्हटलं तरी अशी ही रोमहर्षक, चैतन्यमय, वय विसरवायला लावणारी, तरूणाईस साद घालणारी स्फूर्तीस्थळे अन्यत्र शोधून सापडायची नाहीत. भव्य साह्यकडा डोळ्यांत मावतो का पाहा. त्यावरुनच आपण किती खुजे आहोत हे समजून येईल. एकदा इथला हाडं गोठवणारा गारठा अनुभवा. रानवारा कानांत भरुन घ्या. ऑफिसमधला एसी झक मारेल त्याच्यापुढे. धोधो कोसळणार्‍या धबधब्याखाली भिजा. जकुझी, सोना बाथ आणि शॉवर भिकार वाटू लागतील. खळाळत्या ओढ्याचे (अगदी चहाच्या रंगाचे दिसले तरी) पाणी पिऊन नशा घ्या. व्हिस्की-रम-स्कॉचच्या तोंडात मारेल. संध्याकाळच्या संधीप्रकाशात कड्यावरुन पाय खाली सोडून बसा आणि मनाला येईल तेवढ्या मोठ्या पडद्यावर खाली दरीत दिसणारा सोनेरी प्रकाश आणि आणि त्यावर चमचमणाऱ्या नदीचा आणि तिच्या तीराशी चाललेला रोमान्स अनुभवा. जगातले कुठलेही मल्टीप्लेक्स हा आनंद देऊ शकणार नाही. रात्री चुलीवर केलेली उरलेली मूगखिचडी आणि गरम मॅगी खाऊन मग बिनदुधाचा चहा प्यायले की सकाळचा ब्रेकफास्ट होतो. ट्रेक संपला की पायथ्याच्या गावात एका मामांच्या घरी आधीच सांगून गावरान कोंबडी चापली जाते त्याची सर KFC ला मुळीच नाही. किल्ल्यांवरून दिसणारे सुर्योदय आणि सुर्यास्त हे तर अपूर्व दृश्य आहेत. किल्ल्यांवरून रात्री घडणारे नक्षत्र दर्शन, हा अवर्णनीय आनंद आहे. त्याची तुलना कशाशीच करता यायची नाही.
ध्यानात घ्या, या भुमीत आपले पराक्रमी पूर्वज काही एक इतिहास घडवून गेले आहेत. कित्येकदा त्यांचा जय झाला. कित्येकदा पराभवही. त्या सगळ्या प्राचीन इतिहासाच स्मरण हा आहे या दुर्गभ्रमंतीचा उद्देश ! सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये इतिहासाचे साक्षिदार असलेले किल्ले आजही ताठ कण्याने उभे आहेत. महाराष्ट्र हा किल्ल्यांचा देश मानला जातो ते उगाचच नाही. मरांठ्यांच्या स्वराज्य संग्रामात या किल्ल्यांचा कौशल्याने उपयोग करून मरांठ्यांनी मुघलांसारख्या प्रबळ शत्रुला अक्षरश: धूळ चारली. मराठी माणसांच्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या या किल्ल्यांचा इतिहास चित्तथरारक आहेच , पण त्यांच्या व्यथाही मनाला चटका लावणार्‍या आहेत.
प्रचंड, समृद्ध, बेलाग अशा या सह्याद्री आणि सह्याद्रीतील गड-कोटां विषयी फ़ार कमी लोक जवळुन परिचित आहेत. खरे तर हे गड-कोट म्हणजे या महराष्ट्राचे वैभव. सर्वांणाच या गडांवर जाण्याची खुप इच्छा असते. पण तीथे जायचे कसे, राहण्याची, खाण्याची, पाण्याची सोय व इतर माहिती उपलब्ध नसल्यामुळे ते तिथे जात नाहीत. आणि हे इतिहासाचे साक्ष देणारे दुर्ग दुर्लक्षिले जातात. अशाच आपल्या सर्वांसाठी, हा इतिहास जवळुन माहित करून घेण्यासाठी हा एक छोटासा प्रयत्न..!!! जेणेकरुन आजपर्यंत दुर्लक्षित राहीलेल्या या गड दुर्गांची माहिती हजारो दुर्गप्रेमींना मीळेल. वेबसाइट जरी सह्याद्री व सह्याद्रीतील गड-कोटां च्या इतिहासा बद्दल निगडित असला तरी येथे बाकीच्या गोष्टींबद्दल पण चर्चा होईल. ही वेबसाइट काढण्यासाठी मी महराष्ट्रातील सर्व गड-कोटांची माहिती व छायाचित्रे गोळा करीत आहे. आपण ही आपल्याकडील गड – कोटांची माहिती व छायाचित्रे या ठिकाणी प्रसिद्ध करण्यासाठी contact@thesahyadri.com इथे ई-मेल करु शकता. आपल्या प्रतिसादाची वाट पाहत आहे.